वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅनलाईन सुविधांचा बट्टयाबोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 03:09 PM2019-08-19T15:09:53+5:302019-08-19T15:10:22+5:30

‘हायस्पीड इंटरनेट’अभावी सर्वच केंद्र तकलादू ठरत असून आॅनलाईन सुविधांचा पुरता बट्टयाबोळ झाला आहे.

Online access to rural areas in Washim district disrupted | वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅनलाईन सुविधांचा बट्टयाबोळ!

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅनलाईन सुविधांचा बट्टयाबोळ!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आॅनलाईन सुविधा पुरविण्याकरिता ग्रामपंचायत, महा-आॅनलाईन आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ११३० आॅनलाईन सुविधा केंद्र स्थापन झाले आहेत; मात्र ‘हायस्पीड इंटरनेट’अभावी सर्वच केंद्र तकलादू ठरत असून आॅनलाईन सुविधांचा पुरता बट्टयाबोळ झाला आहे.
प्रशासनातील कामे अधिक वेगाने तथा पारदर्शक पद्धतीने व्हावी, ग्रामीण जनतेला शासकीय योजनांचा विनाविलंब लाभ मिळावा, यासाठी शासनाने बहुतांश ग्रामपंचायतीचा कारभार ‘आॅनलाईन’ केला आहे. वाशिम जिल्ह्यात याअंतर्गत ३४० ग्रामपंचायतींमध्ये संगणक, प्रिंटर, ब्रॉडबॅन्ड सुविधा पुरविण्यात आली आहे. याशिवाय १९९ ठिकाणी ‘महा-आॅनलाईन’चे सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित असून ६०० ठिकाणी ‘सीएससी’ अर्थात आपले सरकार सेवा केंद्र स्थापित झाले आहे. या एकंदरित ११३० आॅनलाईन सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी करणे व त्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, रहिवासाचा, विवाहाचा दाखला, नोकरी किंवा व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे, मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र, मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र, नवोदय प्रमाणपत्र, बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र, विजेच्या जोडणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र, कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय दाखला, जॉब कार्ड, घर बांधकामासाठी अनुमती, नळजोडणी परवानगी, चारित्र्याचा दाखला तसेच सात/बारा, आठ ‘अ’, फेरफार आदी दस्तावेज आॅनलाईन स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र बहुतांश ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट मिळत नसल्याने आॅनलाईन सुविधा केंद्र निष्फळ ठरत आहेत.
काही ग्रामपंचायतींनी या समस्येवर पर्याय म्हणून खासगी मोबाईल कंपन्यांचे इंटरनेट वापरणे सुरू केले; परंतु त्यालाही अपेक्षित रेंज मिळत नसल्याने कामे खोळंबत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.


महानेट प्रकल्पाची कामे धिम्यागतीने
राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या महानेट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चार तहसील कार्यालये व त्याअंतर्गत येणाऱ्या ३४६ ग्रामपंचायतींना १५५० किलोमिटर अंतराचा केबल टाकून आॅप्टिकल फायबर नेटवर्क ब्रॉडबँडव्दारे जोडले जाणार आहे. या कामाचा कंत्राट स्टरलाईट लि. या कंपनीला देण्यात आला आहे. दरम्यान, आॅगस्ट-सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र काम अगदीच धिम्यागतीने सुरू असून ३४६ पैकी एकाही ग्रामपंचायतीमध्ये अद्यापपर्यंत महानेट प्रकल्पांतर्गत उच्चप्रतीची इंटरनेट सुविधा मिळालेली नाही.


जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उच्चप्रतीची इंटरनेट जोडणी मिळण्यासाठी महानेट प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्याची गती वाढविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात येतील.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम


सद्य:स्थितीत जिल्ह्यात महामार्गाची कामे सुरू असून शेतांमध्येही खरीप हंगामातील पिके उभी आहेत. त्यामुळे महानेट प्रकल्पांतर्गत आॅप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम प्रभावित होत आहे. सदर अडचणींवर मात करूनही कामे पूर्ण करण्याचा सर्वंकष प्रयत्न सुरू आहे.
- शेख जुनेद
जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, महानेट

Web Title: Online access to rural areas in Washim district disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.