‘ऑनलाईन क्लासेस’मुळे विद्यार्थ्यांना ‘डोकेदुखी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:34 AM2020-08-17T11:34:28+5:302020-08-17T11:34:40+5:30
डोळ्यावर परिणाम होण्याबरोबरच डोकेदुखीचा (मायग्रेन) त्रासही जाणवत असल्याचे समोर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकाचा वापर वाढल्याने डोळ्यावर परिणाम होण्याबरोबरच डोकेदुखीचा (मायग्रेन) त्रासही जाणवत असल्याचे समोर येत आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असून, यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे राज्यात १६ मार्चपासून शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे वर्ग नेमके केव्हा सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॅनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. आॅनलाईन शिक्षणामुळे स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणकावरील स्क्रीन टाईम वाढला आहे. त्याचे विद्यार्थ्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत आहे. तासनतास टॅब, मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर बसल्याने विद्यार्थ्यांना डोळेदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे पालक अमर रामवाणी, शंकर केसवाणी, मिलिंद अरगडे, अमोल उमाळे, दशरथ पवार आदींनी सांगितले.
मोबाईल, संगणकावर सतत आॅनलाईन राहिल्यामुळे डोळे, मेंदुवर ताण पडतो. त्यामुळे साहजिकच डोकेदुखीचा त्रास जाणवतो. चिडचिडही वाढू शकतो. मेंदूवर जास्त ताण आल्यास अभ्यासात मन लागत नाही.
- डॉ.नरेश इंंगळे,
मेंदु व मानसोपचार तज्ज्ञ वाशिम
मोबाईल, संगणकावर अभ्यास करताना जास्त वेळ आॅनलाईन ‘स्क्रिन टाईम’ असेल तर डोळ्याला त्रास जाणवू लागतो. डोळ्यावर ताण येत असल्याने डोकेदुखी त्रासही जाणवतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची दक्षता घ्यावी. - डॉ. स्वीटी गोटे,
नेत्ररोग तज्ज्ञ, वाशिम
आॅनलाईन शिक्षणामुळे मुलांना जास्त प्रमाणात मोबाईल, संगणक, टॅबचा वापर करावा लागतो. यामुळे मुलांना डोळेदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास्त जाणवतो. मानदुखीचा त्रासही मुलांना जाणवत आहे.
- विनोद बसंतवाणी
पालक, वाशिम