पुस्तकाविनाच ३० टक्के विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:35+5:302021-08-12T04:46:35+5:30
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: ...
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली. त्यापैकी ७० टक्के पुस्तकांचा पुरवठा गत महिन्यात झाला आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यातही आली आहेत. दरम्यान,जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांना ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करणे आवश्यक असताना अद्यापही ३० टक्के विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नाही. पुस्तकेच मिळाली नसल्याने शिक्षकांनाही ऑनलाइन धडे देताना अडचणी येत आहेत.
----------------------
कोट: शासनाकडे नोंदविलेल्या मागणीनुसार ७० टक्के पुस्तके गत महिन्यात प्राप्त झाली आणि त्यांचे वितरणही करण्यात आले. उर्वरित ३० टक्के पुस्तकेही उपलब्ध झाली असून, तालुकास्तरावर त्यांचे वितरण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
-गजाननराव डाबेराव,
प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)