पुस्तकांविनाच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:10+5:302021-07-14T04:46:10+5:30

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: ...

Online learning of students without books! | पुस्तकांविनाच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण !

पुस्तकांविनाच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण !

Next

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि. प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आता शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी पुस्तकेच मिळाली नसल्याने शिक्षकांनाही ऑनलाइन धडे देताना अडचणी येत आहेत.

----------------------

मुलांनी जुनी पुस्तके परत केली नाही

१) शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

२) २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते.

३) अद्याप एकाही विद्यार्थ्याने जुनी पुस्तके शाळेत परत केलेली नाहीत आणि त्यामुळे जुन्या पुस्तकांचे संकलन झाले नाही.

४) आता शाळेतील शिक्षकांनी घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन केल्यास अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके वितरित करता येणार आहेत.

--------------

पुस्तकेच नाहीत, अभ्यास कसा करणार ?

१) कोट : गेल्या पंधरा दिवसांपासून आम्हाला ऑनलाइन पद्धतीने धडे देण्यात येत आहेत. तथापि, आम्हाला अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने अभ्यास कसा करावा, असा प्रश्न पडला आहे.

-सचिन इंगोले, विद्यार्थी

----------

२) कोट: ऑनलाइन शिक्षण सुरू झाले तरी आम्हाला मोफत पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे अभ्यास करावा कसा, असा प्रश्न आहे. गतवर्षीची जुनी पुस्तकेही शोधली; परंतु मिळाली नाही.

- फरहान परसूवाले, विद्यार्थी

--------

कोट: यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे; अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. विभागस्तरावरून लवकरच पुस्तके प्राप्त झाल्यानंतर वितरण केले जाणार आहे.

- गजाननराव डाबेराव,

प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि. प. वाशिम

^^^^^^^^^^^

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

वर्ग - विद्यार्थी

पहिली -१९,६९०

दुसरी - २०,१९८

तिसरी -१९,६१८

चौथी -२१,१७७

पाचवी -२१,०५२

सहावी - २१,१३६

सातवी -२१,४३६

आठवी -२१,५००

Web Title: Online learning of students without books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.