वाशिम जिल्ह्यात ‘आॅनलाईन’ सात-बारा, आठ ‘अ’, फेरफार मिळणे झाले कठीण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 05:19 PM2019-03-23T17:19:35+5:302019-03-23T17:19:53+5:30
‘वेबसाईट’ हाताळताना तलाठ्यांना विविध स्वरूपातील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागातील बहुतांश कामे प्रभावित झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणात ‘आॅनलाईन’ फेरफार घेण्यासह सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज ज्या ‘वेबसाईट’वरून दिल्या जायचे, त्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली आहे; परंतु पुरेसे ज्ञान नसल्याने ही ‘वेबसाईट’ हाताळताना तलाठ्यांना विविध स्वरूपातील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महसूल विभागातील बहुतांश कामे प्रभावित झाली आहेत.
पुर्वी हस्तलिखीत स्वरूपात दिला जाणारा फेरफार आता ‘आॅनलाईन’ पद्धतीने दिला जात आहे. याशिवाय सात-बारा, आठ ‘अ’ हे महत्वाचे दस्तावेज देखील संबंधित अधिकाºयांच्या डिजिटल स्वाक्षरीने ‘आॅनलाईन’ देण्यात येत आहेत. त्यासाठी ठराविक ‘वेबसाईट’ कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. मात्र, यात पुन्हा एकवेळ मोठा बदल करित पुर्वीच्या सर्व ‘वेबसाईट’ बंद करून नवी ‘वेबसाईट’ सुरू करण्यात आली. त्यावर काम करित असताना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सर्वच प्रकारची कामे प्रभावित होत असल्याने तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रांसह तलाठ्यांकडेही शेतकºयांची शेकडो कामे प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे.