आॅनलाईन सातबारा ठप्प, तलाठीही मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:36 PM2019-05-06T16:36:10+5:302019-05-06T16:36:24+5:30
शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. त्यात तलाठीही जागेवर मिळेनासे झाल्याने शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन तलाठी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंतही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर अंतर्गत एका मंडळ अधिकाºया व्यतीरिक्त शिरपूरच्या तीन भागांसह विविध गावे मिळून ९ तलाठी कार्यरत आहेत. या तलाठ्यांकडे संबंधित गावांतील हजारो ग्रामस्थ आणि शेतकºयांच्या कामकाजाची जबाबदारी आहे. तथापि, यातील काही तलाठी आपल्या जबाबदारीबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती सोमवार ६ मे रोजी आली. सद्यस्थितीत शेतकरी खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास धडपडत आहेत. त्यासाठी त्यांना शेतीच्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत असून, ही कागदपत्रे तलाठ्यांकडूनच मिळू शकतात. सातबाराचे दस्तऐवज आॅनलाईन झाले असले तरी, सातबाराचे संकेतस्थळच ठप्प असल्याने शेतकºयांना आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. सोमवार ६ मे रोजी अनेक शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठी कार्यालयावर दाखल झाले; परंतु १२ वाजून गेले तरी, शिरपूर भाग २ चे तलाठी येथील पी. एस. अंभोरे, वसारीचे तलाठी एन.एम. केकन आणि शेलगाव बोंदाडेचे तलाठी बी. आर वाघ हे कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे विविध कामासाठी आलेल्या शेतकºयांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंडही त्रास सहन करावा लागला. विविध गावांतून पैसे खर्च करून तलाठी कार्यालयात यायचे. त्या ठिकाणी तासनतास प्रतिक्षा करायची, त्यानंतही काम होत नसेल, तर शेतकºयांनी करावे काय, असा प्रश्न संबंधित गावातील शेतकºयांनी केला असून, याकडे मंडळ अधिकारी तथा तहसिलदारांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने मिळालेल्या आॅफलाइन सातबारावर पीकर्ज घेण्यासाठी तलाठ्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात आलो; परंतु स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात उपस्थित नसल्याने आमची दोन वेळेची चक्कर वाया गेली.
- भालचंद्र देशमुख, शेतकरी शिरपूर
माझी शेती वाकद शेत शिवारामध्ये आहे. मलासुद्धा आॅफलाईन सातबारावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यायची होती. मात्र तलाठी बी.आर वाघ कार्यालयात उपस्थित नसल्याने मला स्वाक्षरी मिळू शकली नाही.
- कमल कव्हर शेतकरी, वाकद
शिरपूर भाग नंबर दोनचे तलाठी पी. एस. अंभोरे व वसारी येथील एन. एम. केकन हे दोन्ही तलाठी दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित नव्हते. त्यामुळे निश्चितच शेतकºयांना त्रास झाला. याविषयी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवून, त्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल.
-घनश्याम दलाल
मंडळ अधिकारी शिरपूर जैन.