ऑनलाइनने विद्यार्थी हायटेक; परंतु पाया राहतो कच्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:42 AM2021-04-22T04:42:18+5:302021-04-22T04:42:18+5:30
शहरी भागासह ग्रामीण भागात ऑनलाइनसाठी महागडे मोबाइल आले. या प्रवाहात विद्यार्थी हायटेक बनत असताना प्राथमिक शिक्षणाचे मूळ असलेल्या पायाभूत ...
शहरी भागासह ग्रामीण भागात ऑनलाइनसाठी महागडे मोबाइल आले. या प्रवाहात विद्यार्थी हायटेक बनत असताना प्राथमिक शिक्षणाचे मूळ असलेल्या पायाभूत प्रत्यक्ष शिक्षणापासून मुले दूरच राहत आहेत. पाहिल्या वर्गातील मुले तर शाळा शिक्षक न पाहता दुसऱ्या वर्गात गेली आहे.
मार्च २०२०पासून शाळा बंद आहेत. याकाळात विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहू नयेत, म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरुवात झाली. ऑनलाइनच्या नावाखाली मोबाइल हातात आला की मुले गेम आणि कार्टून पाहण्यात दंग झाले. यामुळे मैदानी खेळावर याचा परिणाम झाला. यापूर्वी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत दररोज परिपाठ, प्रार्थना, प्रतिज्ञा, दिनविशेष, यासह उजळणी, बाराखडी म्हटली जायची. परंतु आता ऑनलाइनमध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला पडत आहेत. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यांना जोडशब्द, काना, मात्रा हे अवघड जात आहे. ऑनलाइनमुळे गुगल, क्रोम यासह वेगवेगळ्या साइट्स यासह विविध गेम व यू-ट्यूबसारखे चॅनलची पूर्ण माहिती मुलांना झाली असल्याने विद्यार्थी ‘हायटेक’ बनले आहेत. परंतु शिक्षणाचा मूळ पाया मात्र कच्चा राहत असल्याचे पालकांच्या निदर्शनात येत आहे.
शाळा सुरू असताना विद्यार्थी चार ते पाच तास अभ्यास करायचे, अनेक गोष्टी मुखपाठ करायचे; पण आता ऑनलाइनमुळे फक्त ठरावीक वेळेत मोबाइल घेऊन बसतात. नंतर मात्र ना गृहपाठ अभ्यास करत नाहीत. याचा मोठा परिणाम झाला आहे. याउलट शाळेत प्रत्यक्षात शिकवायचे, समोरासमोर शिक्षक - विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यायचे.
संतोष खटोड, पालक, मालेगाव