संत्रा पिकावरील कीड, रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:56+5:302021-06-25T04:28:56+5:30
कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक ...
कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. प्रशिक्षणात दिल्या जाणाऱ्या संत्रा पिकाच्या शिफारशीत पीक संरक्षण तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा तसेच शिफारशीत औषधींचा वापर करूनच पीक संरक्षण करावे व फळ बागायती शेतकऱ्यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करून खर्च कमी करावा, असे आवाहन डॉ. रवींद्र काळे यांनी केले. राजेश डवरे यांनी संत्रावर्गीय पिकावरील विविध किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानाचा प्रकार यावर प्रकाश टाकला. तसेच संत्रा पिकावरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेअंतर्गत वनस्पतीजन्य विविध कीटकनाशकांचा वापर, पिवळे चिकट सापळे यांचा वापर, संत्रा पिकावरील फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगांसाठी आमिषाचा वापर, तसेच किडीकरिता लेबल क्लेम शिफारशीत कीटकनाशकांचा वापर याविषयी विस्तृत विवेचन केले. त्यांनी संत्रा पिकावरील विविध रोग व त्याचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी विवेचन केले. या प्रशिक्षण वर्गात विषय विशेषज्ञ उद्यानविद्या निवृत्ती पाटील यांनीही सहभाग नोंदविला व तांत्रिक सादरीकरणाच्या शेवटी दोन्ही शास्त्रज्ञांनी संत्रा पिकासंदर्भात शेतकऱ्यांनी विचारलेल्या उत्पादन व पीक संरक्षण या विषयीच्या विविध शंका व प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणकतज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.