सोयाबीन पिकातील तणनाशक वापराविषयी ऑनलाईन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:26 AM2021-07-09T04:26:13+5:302021-07-09T04:26:13+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे, तर मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कृषी ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे, तर मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या तज्ज्ञ टी. एस. देशमुख उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेती करणे, ही काळाची गरज असल्याचे सांगत विविध कीडनाशकांचा वापर करण्यापूर्वी व विशेषत: तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय त्याचा वापर करू नये तसेच एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अंगिकार करावा व तणनाशके फवारताना स्वतंत्र पंप वापरावा, अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी, असे आवाहन केले. प्रमुख मार्गदर्शक टी. एस. देशमुख कृषी विद्यातज्ज्ञ यांनी सोयाबीन पिकातील तणनाशक वापर या विषयावरील मार्गदर्शन करताना शेतातील तणांची ओळख, तणनाशकाचे प्रकार, फवारणी काळ व घ्यावयाची काळजी, एकात्मिक तण व्यवस्थापन तसेच सोयाबीन पिकासाठी शिफारस तणनाशक वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. संगणक तज्ज्ञ एस. आर. बावस्कर यांनी आभार मानले.
----------------
सुरुवातीच्या ३० दिवसांत तणामुळे उत्पन्नावर परिणाम
सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून ते सुरुवातीच्या ३० दिवसांत तण नियंत्रणाकरिता विविध तणनाशकांचा वापर करण्यात येतो. पिकातील वाढणाऱ्या तणांमुळे सुरुवातीच्या एक महिन्यातील पीकवाढीच्या काळात सूर्यप्रकाश, अन्नद्रव्य, ओलावा, जागा याकरिता पिकांशी स्पर्धा झाल्याने पिकांच्या उत्पादनात मोठी घट येते. या पार्श्वभूमीवर तणनाशक वापराविषयी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले.