जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:42 PM2019-05-10T15:42:59+5:302019-05-10T15:43:02+5:30

जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे.

Only 16 tankers sanctioned in the district, Taha for drinking water | जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

जिल्ह्यात केवळ १६ टँकरला मंजुरी, ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

Next

वाशिम: जिल्ह्यातील शेकडो गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, काही गावांत यावर नियंत्रणासाठी केवळ टँकरने पाणी पुरवठा हाच अंतिम पर्याय आहे. यासाठी ३० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय स्तरावर प्रस्तावही पाठविले; परंतु सद्यस्थितीत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर पाच प्रस्ताव त्रुटीमुळे रखडले आहेत. 

वाशिम जिल्ह्याची भुजल पातळी सव्वा मीटरने खालावली असताना विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. तीन मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा आहे, तर १०९ लघू प्रकल्पापैकी जेमतेम ६० प्रकल्पांत मृतसाठा उरला आहे. त्यामुळे रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा आणि वाशिम या सहाही तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकत आहेत. त्यामुळे संंबंधित ग्रामपंचायतींनी पंचायत समितीमार्फत उपविभागीय अधिका-यांकडे विहिरी, कूपनलिका अधिग्रहणासह टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यात टँकरच्या प्रस्तावांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे. तथापि, उपविभागीय अधिका-यांमार्फत जिल्हास्तरावर केवळ २४ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील केवळ १६ प्रस्तावांनाच अंतिम मंजुरी मिळाली आहे, तर ८ पैकी ५ प्रस्ताव त्रुटीअभावी रखडले आहेत. पाणीटंचाई निवारणाबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
--------------------
१० गावांत टँकरच्या २८ खेपा 
जिल्हास्तवरून मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष १० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असून, यात वाशिम तालुक्यातील बाभुळगाव येथे ५ हजार लीटर टँकरच्या १० खेपा, रिसोड तालुक्यातील करंजी येथे ५ हजार लीटरच्या ५ खेपा, मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे येथे २४ हजार लीटरच्या ४ खेपा, धानोरा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा,मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर येथे २४ हजार लीटरच्या दोन आणि गलमगाव येथे १२ हजार लीटरची एक, कारंजा तालुक्यात्ील दादगाव आणि धोत्रा देशमुख येथे २४ हजार लीटरची प्रत्येकी एक, तर गिर्डा येथे २४ हजार लीटरच्या दोन खेपा, अशा प्रमाणात ग्रामस्थांना पाणी पुरवठा करून तहान भागविण्याचा प्रयत्न होत आहे.

Web Title: Only 16 tankers sanctioned in the district, Taha for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.