वाशिम जिल्ह्यातील १३४ धरणांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:31 PM2019-08-27T14:31:47+5:302019-08-27T14:34:23+5:30
दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही.
वाशिम : चालूवर्षीच्या पावसाळ्यात रिमझिम स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे; मात्र दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ धरणांमध्ये केवळ १८.८६ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. यात वाशिमच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात ४१.८५, मालेगाव तालुक्यातील सोनलमध्ये १३.८९; तर कारंजा तालुक्यातील सोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. याशिवाय वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजरोजी ३५.६३, मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये १५.२८, रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये १४.१४, मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांमध्ये १०.३५, मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांमध्ये १६.०३; तर कारंजा तालुक्यातील १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा झाला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसाने हजेरी न लावल्यास आणि धरणे तुडूंब न भरल्यास आगामी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही. यासोबतच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.