जिल्ह्यात आढळली केवळ २७ शाळाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:50+5:302021-03-23T04:43:50+5:30
पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांचे होणारे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या ...
पोटाची खळगी भरण्यासाठी पालकांचे होणारे स्थलांतर, कौटुंबिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे राज्यात शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली जाते. यंदा दि. १ ते १० मार्च या काळात ही मोहीम राबविण्यात आली. यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामीण भागातील बाजार, गावाबाहेरचे पाल, दगडखाणी, मोठी बांधकामे, झोपडपट्ट्या, फुटपाथ आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली. वाशिम जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत केवळ २७ बालके शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
----------
वाशिम तालुक्यात आढळली सर्वाधिक मुले
जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्हाभरात केवळ २७ मुले शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत असून, यात वाशिम तालुक्यातील सर्वाधिक १० मुलांचा समावेश आहे.
------------------
शाळाबाह्य मुलींचे प्रमाण नगण्य
वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात केवळ २७ मुले शाळाबाह्य असल्याचे स्पष्ट झाले. त्यात मुलींची संख्या केवळ ६ असून, एकूण शाळाबाह्य मुलांच्या संख्येत मुलींचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.
------------------
३००० हजार कर्मचारी मोहिमेत
वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या कामासाठी जिल्हा परिषदेकडून ३००० हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी १० मार्चपर्यंत सर्वेक्षण करून शिक्षण विभागाकडे आकडेवारी दिली.
-----------------
कोट : जिल्ह्यात १ ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शासन निर्देशानुसार निर्धारित ठिकाणी सहा तालुक्यात ३००० हजार शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांची माहिती घेतली. त्यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील २७ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
- गजाननराव डाबेराव,
प्रभारी उपशिक्षणाधिकारी, जि. प. वाशिम