वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:37 PM2021-04-08T16:37:29+5:302021-04-08T16:37:36+5:30

Corona Vaccine : एप्रिल महिन्यात लसीचा तुटवडा जाणवत असून सध्या जिल्ह्यात केवळ साडेपाच हजार डोस शिल्लक आहेत.

Only 5,500 doses of corona vaccine remain in Washim district | वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक

वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान एप्रिल महिन्यात लसीचा तुटवडा जाणवत असून सध्या जिल्ह्यात केवळ साडेपाच हजार डोस शिल्लक आहेत.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आला होता. आता पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाचे रुग्ण वाढत गेले; मात्र आकडा नियंत्रणात होता. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला. एप्रिल महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे.
याअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५८४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला आणि २६९३ कर्मचाऱ्यांना दुसरा डोज देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’पैकी ७६५० जणांनी पहिला व २८५२ जणांनी लसीचा दुसरा डोज घेतला.
४५ वर्षावरील ६५८२७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या आरोग्य विभागाकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा ५५०० डोस उपलब्ध असून, वरिष्ठांकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. १५ एप्रिलदरम्यान लसीचा साठा उपलब्ध होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Only 5,500 doses of corona vaccine remain in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.