निगेटिव्ह अहवाल असेल तरच जाता येणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:25 PM2021-04-18T12:25:29+5:302021-04-18T12:25:36+5:30
Sub-Regional Transport Office : ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय प्रवेश देण्यात येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता अर्जदाराच्या प्रतिनिधींना प्रवेश नसून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना ॲंटीजन चाचणी करुन ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय प्रवेश देण्यात येणार नाही.
राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजता पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत सूचना आणि निर्देश जारी केले आहे. त्याच अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथील कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. अभ्यागतांना तसेच अर्जदारांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना सकाळी १० ते दुपारी २ वाजता दरम्यान ॲंटीजन चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.ए. हिरडे यांनी दिला.
अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रुव्ह केलेले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहणार आहे.
वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद घेणे,कमी करणे आदी प्रकरणी वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करीत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने सदर कामकाजासाठी कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. आवश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवाना विषयक कामकाज सुरु राहील. शिकावू अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती विषयी कामकाज बंद राहील. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन हिरडे यांनी केले.