मानोरा एमआयडीसीत केवळ एक उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 02:42 PM2020-01-21T14:42:36+5:302020-01-21T14:42:42+5:30
अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव उद्योग एमआयडीसीत सुरू असून जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला.
- माणिक डेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रशस्त जागेवर उद्योगांसाठी ३५ भुखंड पाडण्यात आले. त्यातील १५ भुखंड उद्योगांकरिता मागणी करणाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले; मात्र मुलभूत सुविधांअभावी आजमितीस अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव उद्योग एमआयडीसीत सुरू असून जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला. उद्योगांसंबंधीच्या या बिकट अवस्थेमुळे मानोरा तालुक्यात बेरोजगारीचा आलेख उंचावला असल्याचे दिसून येत आहे.
छोट्या-मोठ्या स्वरूपातील उद्योगांना चालना मिळावी, यामाध्यमातून रोजगार निर्माण होऊन सुशिक्षित युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अन्य तालुक्यांप्रमाणेच मानोरा तालुक्यातही एमआयडीसीकरिता ठराविक जागा राखून ठेवलेली आहे. त्यावर ३५ भुखंड पाडण्यात आले असून १५ भुखंड उद्योग करू इच्छित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. असे असले तरी एमआयडीसी परिसरात आजपर्यंत उद्योगांना आवश्यक ठरू पाहणाºया कुठल्याच ठोस सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. गतवर्षी परिसरात रस्ते तयार करण्यात आले; मात्र पाणी, विज, आवारभिंत यासह अन्य महत्वाच्या सुविधांची अद्याप उणिव भासत आहे. यामुळेच सुस्थितीत सुरू असलेला जिनींग कारखाना काही दिवसांपूर्वी बंद पडला असून सद्य:स्थितीत केवळ अगरबत्ती तयार करण्याचा एकमेव कारखाना एमआयडीसीत सुरू आहे. ‘एमआयडीसी’चे संबंधित अधिकारी अकोला येथील कार्यालयात बसत असल्याने नेमकी कैफीयत कुणाकडे मांडावी, असा प्रश्न नवउद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. सुविधा नसल्याने भुखंड ताब्यात घेऊनही त्यावर उद्योग सुरू करायला कुणी धजावत नसल्याचे बोलले जात आहे.
मानोरा येथील एमआयडीसीमध्ये एकूण ३५ भुखंड पाडण्यात आले आहेत. त्यापैकी उद्योग करू इच्छित युवक, नागरिकांना १५ भुखंड देण्यात आले आहेत. त्यात अगरबत्ती तयार करण्याचा एक कारखाना सद्या सुरू आहे. कापूस प्रक्रिया करणारा जिनिग कारखाना मात्र बंद पडला. विज, पाणी, रस्ते यासह इतर सुविधा उभारणे सुरू आहे.
- दिगंबर वाकोडे
ट्रेसर, एमआयडीसी, अकोला