३३ गावांमधील रुग्णांसाठी केवळ एक वैद्यकीय अधिकारी!
By Admin | Published: July 7, 2017 01:10 AM2017-07-07T01:10:59+5:302017-07-07T01:10:59+5:30
रुग्णसेवा प्रभावित : आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन : नजिकची ३३ खेडी जोडलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ही समस्या अधिकच जटील बनली असून, आरोग्य विभागाचे मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.
शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील ३३ गावांचा समावेश होतो. यायोगे लाखापेक्षा अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पेलावी लागत असताना पुरेसे मनुष्यबळ देण्याकामी वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.
या आरोग्य केंद्रात वर्षाकाठी सुमारे ३०० कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होतात. शिरपूर येथे पोलीस स्टेशन कार्यान्वित असल्यामुळे या अंतर्गत अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांसोबतच विविध घटनांमधील आरोपींचे ‘मेडिकल’ करण्यासाठी आरोग्य केंद्रात नेले जाते; परंतु अपेक्षित मनुष्यबळच नसल्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यावरच अतिरिक्त ताण पडत असल्याचे दिसून येत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन वैद्यकीय अधिकारी आणि त्यांना सहाय्य करण्याकरिता तीन कर्मचारी असणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष पुरवून रुग्णांची अडचण दूर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गृह राज्यमंत्र्यांचा आदेशही धुडकावला!
शिरपूर जैन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० एप्रिल २०१७ रोजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी उपस्थित आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते; मात्र गृह राज्यमंत्र्यांच्या त्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.