कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:15 PM2021-04-13T12:15:59+5:302021-04-13T12:16:06+5:30
Remedesivir injection : कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार व्हावे यासाठी सरकारी कोविड केअर सेंटरबरोबरच जवळपास १२ खासगी कोविड हॉस्पिटललादेखील परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने साहजिकच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे.
गत १० दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सही, शिक्क्यानिशी चिठ्ठी तसेच रुग्णाचा आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड आदी बाबी बंधनकारक करण्यात आल्या; मात्र कोविड हॉस्पिटलमध्येच रुग्ण भरती असावा, अशी अट सुरुवातीला नसल्याने रेमडेसिविर इंजेक्शन नॉन कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या मेडिकलमध्येदेखील उपलब्ध होत होते. कोविड रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय नॉनकोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने कृत्रिम तुटवडा जाणवत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. नॉन कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चिठ्ठीवर तसेच नॉन कोविड हॉस्पिटलमधील कोणत्याही रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)
आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावे
कोरोना रुग्णाला खरोखरच रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असेल तरच डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे. सरकारी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यकतेनुसारच इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे खासगी कोविड हॉस्पिटलमध्येदेखील आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्यात यावे तसेच नॉन कोविड रुग्णालयाशी संबंधित मेडिकलमध्ये इंजेक्शन देण्यात येणार नाहीत. रुग्णांनीदेखील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे. रेमडेसिविर इंजेक्शनचा यापुढेही तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम