कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:39 AM2021-04-13T04:39:50+5:302021-04-13T04:39:50+5:30

वाशिम : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. ...

Only patients at Kovid Hospital will get Remedacivir injection! | कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन !

कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन !

Next

वाशिम : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले.

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार व्हावे यासाठी सरकारी कोविड केअर सेंटरबरोबरच जवळपास १२ खासगी कोविड हॉस्पिटललादेखील परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने साहजिकच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे. गत १० दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सही, शिक्क्यानिशी चिठ्ठी तसेच रुग्णाचा आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड आदी बाबी बंधनकारक करण्यात आल्या; मात्र कोविड हॉस्पिटलमध्येच रुग्ण भरती असावा, अशी अट सुरुवातीला नसल्याने रेमडेसिविर इंजेक्शन नॉन कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या मेडिकलमध्येदेखील उपलब्ध होत होते. कोविड रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय नॉनकोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने तुटवडा जाणवत होता. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. नॉन कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चिठ्ठीवर तसेच नॉन कोविड हॉस्पिटलमधील कोणत्याही रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या.

००००

बॉक्स

न्युमोनियाच्या नावाखाली उपचार

काही खासगी हॉस्पिटलमध्ये न्युमोनियाच्या नावाखाली कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनुसार आरोग्य विभागाच्या पथकाने पडताळणीदेखील सुरू केली आहे. रुग्णांनी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे तसेच नॉन कोविड हॉस्पिटलच्या संचालकांनी कोरोना रुग्णाला दाखल करून घेऊ नये, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

००

कोट बॉक्स

कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्यात यावे तसेच नॉन कोविड रुग्णालयाशी संबंधित मेडिकलमध्ये इंजेक्शन देण्यात येणार नाहीत. रुग्णांनीदेखील कोविड हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावे. यापुढेही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

०००

आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावे

कोरोना रुग्णाला खरोखरच रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असेल तरच डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे. सरकारी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यकतेनुसारच इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे खासगी कोविड हॉस्पिटलमध्येदेखील आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

०००

Web Title: Only patients at Kovid Hospital will get Remedacivir injection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.