तालुका मुख्यालयी केवळ दोन पोस्टमन, तेही रजेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:43 AM2021-05-21T04:43:32+5:302021-05-21T04:43:32+5:30
मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी घरातच ...
मालेगाव : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी घरातच राहणे आवश्यक आहे. अशावेळी नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँक खात्यातील १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे; मात्र तालुका मुख्यालय असलेल्या मालेगावात केवळ दोन पोस्टमन कार्यरत आहेत. त्यातील एकजण अपघातामुळे; तर दुसरा कोरोनाबाधित असल्याने रजेवर आहे. त्यामुळे बँक खात्यातील रक्कम घरपोच कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निर्बंध काळात डाक विभागामार्फत जनतेला बचत बँक सुविधा, टपाल वाटप, रजिस्टर बुकिंग, स्पीड पोस्ट बुकिंग या सुविधांसोबतच राष्ट्रीयीकृत बँक खात्यातून १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढून पोस्टमनमार्फत अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता नागरिकांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक यासह आवश्यक असलेल्या रकमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल, असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
प्रत्यक्षात मात्र मालेगाव येथील पोस्ट कार्यालयात केवळ दोनच पोस्टमन कार्यरत आहेत. त्यापैकी एकाचा मध्यंतरी अपघात झाल्याने; तर दुसऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने दोघेही सुट्टीवर आहेत. तात्पुरती व्यवस्था म्हणून एका खासगी व्यक्तीकडे टपाल वाटपाचे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने घेतलेला निर्णय मालेगावात तकलादू ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित यंत्रणेने ही बाब लक्षात घेता, मालेगावात पर्यायी पोस्टमनची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.