उघड्यावर शौचवारी; पथक धडके दारी! गुड मॉर्निंग पथक ॲक्शन मोडवर; २२ जणांवर कारवाई
By संतोष वानखडे | Published: September 17, 2022 03:02 PM2022-09-17T15:02:17+5:302022-09-17T15:04:43+5:30
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली.
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाच्या पथकाने उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा गावोगावी भेटी देण्याची मोहिम हाती घेतली आहे. १७ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील चार गावांना भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या २२ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकायार्तून जिल्हा परिषद प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने तीन वर्षांपूर्वीच जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे. जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र दिसून येते.
शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे. या पार्श्वभूमीवर गुड मॉर्निंग पथकाने पुन्हा एकदा कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी (दि.१७) जिल्हा चमूद्वारे वाशिम तालुक्यातील वांगी, धानोरा, एकबुर्जी, अडोळी येथे सकाळच्या सुमारास गुड मॉर्निंग पथकाने धडक देत उघड्यावर शौचास जाणाऱ्या जवळपास २२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. गुड मॉर्निंग पथकात जिल्हा कक्षाचे प्रफुल काळे, शंकर आंबेकर, सुमेर चानेकर, प्रदीप सावळकर, अमित घुले, अभय तायडे, रवी पडघान, बीआरसी कक्षाचे महादेव भोयर आणि वांगी ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी भोयर उपस्थित होते.