प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 03:46 PM2019-12-15T15:46:33+5:302019-12-15T15:47:25+5:30
येत्या अधिवेशानामध्ये १५ कोटी १२ लक्ष रूपयांचा निधी पुरवणी मागणीव्दारे मंजूर होण्याची शक्यता असून यानंतर बांधकामाचे आदेश निघणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : कारंजा येथील प्रशासकीय इमारत बांधकामासाठी १५ कोटींची मान्यता मिळाल्यानंतर इमारत बांधकामाचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला होता. आमदार राजेंद्र पाटणी यांनी गेल्या वर्षभरापासुन केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी उपलब्धतेच्या अनुषंगाने येत्या अधिवेशानामध्ये १५ कोटी १२ लक्ष रूपयांचा निधी पुरवणी मागणीव्दारे मंजूर होण्याची शक्यता असून यानंतर बांधकामाचे आदेश निघणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली.
शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वेळोवेळी होणारी बांधकामं, वाढणारं कामकाज, अभिलेखांची संख्या, नागरिकांची वाढणारी गर्दी तसंच वाहनांच्या पार्किंगची गंभीर समस्या यामुळं ही इमारत नव्यानं बांधणं गरजेचं होतं असे मत आमदार पाटणी यांनी व्यक्त केले. या बांधकामाचा नकाशा हरित इमारत संकल्पनेवर आधारीत असून बांधकामामध्ये पर्यावरणपूरक साहित्यांचाही वापर करण्यात येणार आहे. स्थापत्य कामासाठी तसेच अन्य रक्कमेत विद्युत सुविधा, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, अंतर्गत सुशोभिकरण व इतर सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. इमारतीमध्ये १०९ आसन क्षमतेचे बैठक सभागृह (व्हिडीओ कॉन्फरन्सींग) याबरोबरच अंतर्गत पाणी पुरवठा/साठवण, अग्निरोधक यंत्रणा, अपंगांसाठी उतरंड व्यवस्था, चारचाकी तसेच दुचाकी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टिने सीसीटिव्ही कॅमेरे इमारतीच्या अंतर्गत व बाह्य भागात बसविण्यात येणार आहेत. या प्रशासकीय ईमारतीत तहसील कार्यालय अंतर्गत तलाठी तसेच मंडळ अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच कृषी विभागाचा समावेश असणार आहे. कारंजा येथील तहसील कार्यालय परिसरात प्रशासकीय इमारत बांधण्याची मागणी आ.राजेंद्र पाटणी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली होती. मुख्यसचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती अहवालानुसार यापूर्वीच प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मान्यता दिली होती हे विशेष.
अपेक्षित खर्च
इमारत बांधकामासाठी ८ कोटी ७१ लक्ष ४२ हजार ७१०, रेनवॉटर हार्वेस्टींग, अपंग उतरंडा व इतर ७८ लक्ष ७० हजार ६००, पिण्याचे पाणी ४३ लक्ष ५७ हजार १३६, इलेक्ट्रीय अंतर्गत व बाह्य /अग्निशमन ९७ लक्ष ८५ हजार ६९८, याशिवाय वॉलवंसम्पाऊड, गेट, अंतर्गत रस्ते, दुचाकी-चारचाकी पार्कींग करिता ९८ लक्ष ९० हजार, पाणीसाठा, शौचालय, लाईट, प्रोजेक्ट चार्जेस २९ लक्ष ८५ हजार, ६९२ याशिवाय इतर जीएसटीसह चार्जेस २ कोटी ९१ लक्ष १८ हजार ४१५ असे एकुण १५ कोटी १२ लक्ष ३० हजार २५१ रुपए खर्च अपेक्षीत आहे..