महावितरणचा गलथान कारभार; ग्रामस्थांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:17 PM2019-07-08T16:17:00+5:302019-07-08T16:17:56+5:30
मालेगाव: ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत विज तारा छतालगत लोंबकळत असताना विजखांबही झुकले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत विज तारा छतालगत लोंबकळत असताना विजखांबही झुकले आहेत. यामुळे वादळी वाºयाने या तारा वा खांब कोसळल्यास अपघात घडून ग्रामस्थांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तथापि, महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे.
मालेगाव तालुक्यातील ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत ताकतोडासह दापुरी कालवे, सोमठाणा या गावांचा समावेश आहे. या तिन्ही गावांत मिळून दोन हजार लोक वास्तव्य करीत आहेत. या तिन्ही गावातील ग्रामस्थांना महावितरणच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळत आहेत, तर काही खांबही झुकले आहेत. वादळी वाºयाने वीज तारा तुटून खाली पडण्याच्या घटना काही वेळा घडल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यात गेल्या पाच महिन्यांपासून कोणताही लाईनमन या गावांत फिरकला नाही. बरेच वेळा खाजगी लाईनमनकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून घ्यावे लागते. यासंदर्भात गावकºयांनी शिरपूर, मालेगाव, तसेच वाशिम या ठिकाणी तक्रारी केल्या, निवेदनही दिले; मात्र गावकºयांच्या निवेदनाची दखल घेऊन अद्यापही कोणताही प्रश्न सोडवला नाही. गावात केवळ एकच रोहित्र असून, याच रोहित्रावर कृषीपंपांसह गावकºयांना वीज पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अनेकदा येथील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढण्याची वेळही अनुभवावी लागली. या प्रकारामुळे ग्रामस्थांचा जीवच धोक्यात असल्याने गावकºयांत संतापाची लाट उसळली असून, महावितरणच्या अधिकाºयांनी दखल घेऊ न तातडीने समस्या न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.
आमच्या गावात विजेचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. अनेकदा विजेच्या तारा तुटून खाली पडतात. महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कोणतीही कामे या गावांत केली नाहीत. त्यामुळे थोडाही जोराचा वारा सुटला की वीज तारांचे परस्पर घर्षण होऊन त्या तुटून पडताज. यामुळे अपघात घडण्याची भिती आहे. याबाबत तक्रार आणि निवेदन देऊन दखल घेण्यात आलेली नाही.
-दयानंद व्यवहारे (सरपंच)
गट ग्रामपंचायत, ताकतोडा