‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी
By admin | Published: May 29, 2017 01:22 AM2017-05-29T01:22:52+5:302017-05-29T01:22:52+5:30
जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख : तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कृषी विभाग व ‘आत्मा’मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘रानमाळ’ महोत्सवामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल थेट खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत आयोजित तीन दिवसीय रानमाळ महोत्सव २०१७ चे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमास खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, रिसोड पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. दिनकर जाधव, करडा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एल. काळे, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य माणिकराव देशमुख, नीलेश पेंढारकर, विठ्ठल आरु उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाल्या, की, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी ‘रानमाळ’सारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तालुका स्तरावरही असे उपक्रम आयोजित करण्यासाठी कृषी विभाग व आत्माने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
खासदार भावना गवळी म्हणाल्या की, शेतकरी व शेतकरी उत्पादक गटांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित ‘रानमाळ महोत्सव’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा शेतमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. शेतमालावर प्रक्रिया, बीजोत्पादन करण्याचे काम अनेक शेतकरी उत्पादक गट करीत आहेत, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.