विरोधीपक्ष नेत्यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:18+5:302021-06-04T04:31:18+5:30
ना. फडणवीस हे गुरुवारी हिंगोली जिल्हा दौरा आटोपून सायंकाळी ४.३० वाजता मोटारीने वाशिममध्ये दाखल झाले. स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये असलेल्या ...
ना. फडणवीस हे गुरुवारी हिंगोली जिल्हा दौरा आटोपून सायंकाळी ४.३० वाजता मोटारीने वाशिममध्ये दाखल झाले. स्त्री रुग्णालय इमारतीमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना व आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीनंतर फडणवीस यांंनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, संपूर्ण राज्यात कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी दौरे करीत असून, गुरुवारी वाशिम जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला. पीएम केअर युनिट्समधील व्हेंटिलेटर चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. यानंतरची परिस्थिती लक्षात घेता बालकांकरिता बेड तयार करण्यात येत असून, केंद्र सरकारच्यावतीने दोन ऑक्सिजन प्लांट दिलेले आहेत. आणखी दोन प्लांट मिळणार आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये ५० वयावरील मृत्यूचे प्रमाण अधिक असले तरी इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. म्युकरमायकोसिस संदर्भात प्रशासनाने अधिक सतर्क राहून कोरोनातून डिस्चार्ज मिळालेल्या मधुमेह असणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
०००००
बॉक्स ...
सरकारची नियत साफ नसल्यामुळे मराठा आरक्षण रद्द
आमच्या सरकारने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले. या सरकारची नियत साफ नसल्यामुळे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही, असे टीकास्त्रही ना. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सोडले. राज्य सरकारने केवळ निष्क्रियतेने ओबीसी आरक्षणाचादेखील घोळ घातला असल्याचा आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.