आदर्श गावात देशी दारु दुकान लावण्यास विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:03+5:302021-08-12T04:47:03+5:30
तसेच सदरील नगरपंचायत हद्दीतील दुकानास ग्रामसभा,मासिक सभा न घेता परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या सचिवांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास ...
तसेच सदरील नगरपंचायत हद्दीतील दुकानास ग्रामसभा,मासिक सभा न घेता परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या सचिवांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायतचे सरपंच राजू सोनोणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
शासनाचे विविध लोकोपयोगी कामे राबविल्यामुळे सोमठाणा हे ग्रामपंचायत जिल्ह्यामध्ये नामांकित असून आदर्श ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ग्रा.पं. सोमठाणा येथे सध्या देशी दारूचे दुकान अस्तित्वात नसून कुठल्याही नागरिकांनी देशी-विदेशी दारूच्या दुकानाची मागणी केलेली नाही. येथे कार्यरत असलेल्या सचिवांनी सोमठाणावासी ग्रामस्थांची ग्रामपंचायत मधील काही सदस्यांना हाताशी धरून मोठी फसवणूक केलेली आहे.
महावीरलाल सुखनंदन जयस्वाल या देशी दारू विक्रेत्यास न.पं. मानोरा हद्दीतील दुकान ग्रा.पं. सोमठाणा हद्दीमध्ये स्थलांतरित करण्याचा ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे ,जे पूर्णपणे बेकायदेशीर असून आमच्या गावाची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविणारे आहे. सोमठाणा येथील काही नागरिक आधीच नगरपंचायत हद्दीमधून देशी-विदेशी मद्यप्राशन करून गावामध्ये भांडण-तंटे करून शांतता भंग करीत असल्याने परत ग्रा.पं. सोमठाणा हद्दीत नगरपंचायत मानोरा हद्दीतील दुकान लागल्यास सोमठाणा गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात होण्याची संभावना लेखी तक्रारीमध्ये सरपंच सोनोणे यांनी व्यक्त केलेली आहे.
सोमठाणा ग्रा.प. हद्दीमध्ये दारू दुकान स्थलांतर रोखण्यात यावे आणि दारू दुकान स्थलांतरणास ना हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या सचिवांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सरपंच राजू सोनोणे यांनी केली आहे. दिलेल्या निवेदनाची दखल न घेण्यात आल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरपंच सोनोणे यांनी प्रशासनाला दिला आहे.