चाराटंचाईवर पर्याय; दोनद बु. येथे पौष्टिक गवताची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:40+5:302021-07-22T04:25:40+5:30
कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा ...
कारंजा : दुष्काळ पडला की मोठा प्रश्न उभा राहतो तो जनावरांच्या चराईचा आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या गावाखेड्यांमधील गोठ्यातील गुरे चारा छावण्यांमध्ये बांधण्याची वेळ बळीराजावर येते. गुरांच्या पौष्टिक चाऱ्याची गरज भरून निघावी आणि पौष्टिक व सकस गवत गावातच उपलब्ध व्हावे, या उद्देशाने कारंजा तालुक्यातील दोनद बु.चे सरपंच निरंजन करडे यांनी दोन गुंठे क्षेत्रात पौष्टिक गवताची लागवड केली आहे.
कारंजा लाड तालुक्यातील दोनद बु. गावचे सरपंच निरंजन करडे यांनी अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथून स्वखर्चाने पौष्टिक गवताचे थोंब आणून त्यांच्या शेतात लागवड केली आहे. आता त्यांच्याकडे या गवताचे बी व थोंब तयार झाले आहेत. दोन गुंठे क्षेत्रात लागवड केलेल्या पौष्टिक गवतात पांढरी आंजण-काळी आंजण, धामण, मारवेल, रोडस - डोंगरी, पवण्या शेडा, पांढरी कुसळ आदी जातीच्या गवताचा समावेश आहे. या गवताची पूर्ण वाढ झाल्यानंतर पानी फाउंडेशनकडून समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग गावांना पौष्टिक गवत वाटण्यात येणार आहे. यामुळे कारंजा तालुक्यातील कुरण धन वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या मदतीने यशस्वी होईल आणि तालुक्यातील गावागावांत संरक्षित कुरण क्षेत्र विकसित झालेली पहायला मिळतील.
------------------------
पौष्टिक गवतांचे क्षेत्र वाढवण्यास होणार मदत
जनावरांना चराईसाठी मोकाट सोडणे, बेसुमार तोड यांमुळे जनावरांना चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला असून, गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारचे पौष्टिक गवत नामशेष झाले आहे. या नामशेष होऊ लागलेल्या पौष्टिक गवतांना समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करून त्यांचा प्रसार महाराष्ट्रातील गावागावात करण्यासाठी पानी फाउंडेशन काम करत आहे. यासाठी समृद्ध गाव स्पर्धेत त्यांनी स्वतंत्र विषय ठेवला असून, या माध्यमातून कुरणाचे व पौष्टिक गवताचे क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे.
-------------
कोट : गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न मिटविण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही पौष्टिक गवताची लागवड दोन वर्षांपूर्वी केली. या गवताची चार वेळा छाटणीही झाली असून, आता पाच प्रकारचे गवत चांगले वाढत आहे. इतर शेतकऱ्यांना थोंब, बी मोफत देऊन या गवताचे क्षेत्र वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
- निरंजन करडे,
सरपंच तथा शेतकरी, दोनद बु.
--------
कोट : भविष्यात जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा यासाठी प्रत्येक गावाने गायरान वनात, उपलब्ध सार्वजनिक जमिनीवर अथवा बांधावर चराईबंदी करून पौष्टिक गवताची लागवड करून जनावरांसाठी राखीव चाऱ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे ज्यावेळेस आपल्याकडे चाऱ्याची कमतरता भासेल त्यावेळी तो चारा उपलब्ध होईल आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल
- रवींद्र लोखंडे,
तालुका समन्वयक, कारंजा, पानी फाउंडेशन