वाशिम जिल्ह्यात बुरशीमुळे संत्रा बाग धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:13 PM2020-12-15T19:13:35+5:302020-12-15T19:13:50+5:30
Agriculture News किडीद्वारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फलधारणा कमी होते.
वाशिम : बरशीजन्य आजारामुळे जिल्ह्यातील संत्रा बाग धोक्यात सापडली आहे. कृषी विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
जिल्ह्यात संत्रा बगीच्यांमध्ये झाडांना हस्त बहाराची नवीन नवती फुटलेली आहे. या नवीन नवती व मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणाºया काळीमाशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. काळ्या माश्यांचे प्रौढ व पिल्ले कोवळ्या पानातील अन्न रसाचे शोषण करतात व शरीरातून मधासारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात. त्यावर काळ्या बुरशीची पानावरती झपाट्याने वाढ होते. किडीद्वारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फलधारणा कमी होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करावी, काही शंका, अडचणी असतील तर कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन शंकर तोटावार यांनी केले.