दराअभावी संत्रा उत्पादक शेतकरी संकटात!
By admin | Published: March 22, 2017 02:57 AM2017-03-22T02:57:57+5:302017-03-22T02:57:57+5:30
दरात ७0 टक्के घसरण; चलन तुटवड्याचा परिणाम.
निनाद देशमुख
रिसोड, दि. २१- केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांपासून विस्कळीत झालेले किरकोळ व्यवहार सुरळीत होत असले तरी, संत्रा उत्पादकांना मात्र या निर्णयाचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत संत्र्याच्या दरात तब्ब्ल ७0 टक्क्यांची घट झाली असून, चांगल्या दर्जाच्या संत्र्यालाही खरेदीदार मिळेनासे झाले आहेत.
जिल्हय़ात वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा व रिसोड तालुक्यात अनेक शेतकर्यांनी सत्र्यांचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मंगरुळपीर, कारंजा व रिसोड तालुक्यात आहे. रिसोड तालुक्यात जवळपास १५0 हेक्टर बागायती क्षेत्रात संत्र्याची लागवड करण्यात आली आहे. एकट्या शेलगाव येथे १0 ते १५ शेतकर्यांनी संत्र्याची लागवड केली आहे. वर्षातून दोनदा येणार्या संत्र्याला सुरुवातीला नोटाबंदी व आता कॅशलेस व्यवहाराचा जोरदार फटका बसला आहे. मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. कारंजा तालुक्यात १५0 च्यावर शेतकर्यांच्या संत्र्याच्या बागा आहेत. आंबिया बहराला पाहिजे तशी किंमत मिळाली नसल्यामुळे मृग बहराच्या संत्र्यातून नुकसान भरून काढता येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होते; परंतु नोटाबंदीच्या निर्णयानंतर शासनाने कॅशलेस व्यवहारावर भर दिल्यामुळे व्यापारी शेतकर्यांना संत्राबागा खरेदीचा मोबदला रोखीने देण्यात असर्मथ ठरत आहेत. गतवर्षी पाचशे रुपये प्रति दराने विकले जाणारे संत्राफळाचे कॅरेट आता केवळ शंभर ते दीडशे रुपये दराने विकावे लागत आहे. संत्र्याला व्यापार्यांकडून भाव मिळत नसल्यामुळे, शेतकर्यांना स्वत: बाजारात विक्रीसाठी धाव घ्यावी लागत आहे.
मागील वर्षी संत्र्याला चांगला भाव मिळत होता. यंदा मात्र नोटाबंदीमुळे दरात घसरण झाली आहे. पाचशे रुपयांचे कॅरेट शंभर ते दीडशे रुपयाला विकले जात आहे. प्रतवारी चांगली असली तरी, रोख पैशांअभावी खरेदीदारही मिळेनासे झाले आहेत.
- नामदेव वाघ
शेतकरी शेलगाव (रिसोड)