फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:27 PM2019-06-19T15:27:04+5:302019-06-19T15:27:12+5:30
शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा - यावर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी मानोरा तालुक्यातील फळबागा सुकल्या असून, महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय किसान संघ मानोरा तसेच शेतकऱ्यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली.
मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी फळबागेकडे वळत आहेत. काही शेतकऱ्यांनी विकतचे पाणी आणून फळबागा जगविल्या तर अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अक्षरश: वाळल्या आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने सर्वेक्षण करणे आवश्यक असतानाही, अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. मानोरा तालुक्यातील फळबागांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय किसन संघ मानोरा च्यावतीने चंदन धामनडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.