बांधकामासाठी पाणी उपसा न करण्याचे आदेश
By admin | Published: May 8, 2017 01:54 PM2017-05-08T13:54:33+5:302017-05-08T13:54:33+5:30
बांधकामासाठी गाव शिवारातील पाण्याचा उपसा न करण्याचे आदेश तहसीलदार राजेश वझिरे यांनी काढले.
मालेगाव : तालुक्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने बांधकामासाठी गाव शिवारातील पाण्याचा उपसा न करण्याचे आदेश तहसीलदार राजेश वझिरे यांनी काढले.
मालेगाव तालुक्यातील पाणी समस्येची पाहणी करण्यासाठी तहसीलदार राजेश वझीरे यांनी स्वत: सुरूवात केली आहे. वाकळवाडी, पांगरी कुटे, मानका, शिरसाळा, चिवरा, सोमठाणा, दुबळवेल, डोंगरकिन्ही, पांगरखेडा, घाटा, अमानी, वरदरी बु, केळी, भेरा, एकांबा, सुकांडा, आदिंसह सोळा गावांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीत वझीरे यांनी गावातील जलस्त्रोत, विहीर आणि कुपनलिका तसेच अधिग्रहीत केलेल्या गावशिवारातील विहीरींची जलपातळी किती आहे आदी बाबींची पाहणी केली. तहसीलदारांना यावेळी काही गावात तलाठी मुख्यालयी आढळले नाहीत. वाकळवाडीची ग्रामसेविका अकोला जिल्ह्यातुन अपडाऊन करते अशी माहिती उपिस्थतांनी दिली. तसेच दुबळवेल, केळी, भेरासह काही गावात ग्रामसेवक आढळले नाहीत. गैरहजर आढळणाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली. पांगरी कुटे, वाकळवाडी, देवठाणा, खांब पांगरखेडा ही गावे टँकरफिड असल्याने अशा गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले.