इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञानाच्या आधारे फुलविली सेंद्रीय पेरूची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:21 PM2020-10-04T12:21:32+5:302020-10-04T12:21:43+5:30
Hortyculture News Washim पेरूच्या १७०० झाडांची इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञान पद्धतीने एक हेक्टरमध्ये लागवड केली.
- शेख अनिस बागवान
मेडशी (वाशिम) : येथील युवा शेतकरी अजिंक्य मेडशीकर यांनी इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञानाचा आधार घेत रसायनमूक्त, विषमूक्त शेतीची कास धरून मानवी आरोग्यास पोषक अशी सेंद्रीय फळबाग तयार केली. यात त्यांनी पेरूची १७०० झाडे लावली आहेत.
मेडशी येथील अजिंक्य मेडशीकर यांची २०१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेंतर्गत निवड झाली. त्यात त्यांनी पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी परभणीतून मराठवाडा कृषी विद्यापीठात विकसीत पेरूच्या १७०० झाडांची इंडो-इस्त्रायल तंत्रज्ञान पद्धतीने एक हेक्टरमध्ये लागवड केली. यासाठी त्यांना कृषी सहाय्यक विलास ढवळे यांचे मार्गदर्शन लाभले. जैविक पद्धतीने फळबाग करण्याचा त्यांचा सुरुवातीपासूनच मानस होता. त्यासाठी त्यांनी पंजाबराव देशमुख जैविक मिशन अंतर्गत शेतीचा गट अधिग्रहित केला. पेरूची लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतात शेणखत टाकले. फळबागवाढीसाठी तरल खत जैविक पद्धतीने तयार करून फवारण्या केल्या. कंपोस्ट खत तयार करून ते प्रत्येक झाडाच्या मुळाशी दिले. यामुळे जमिनीत जिवाणूची संख्या वाढली. वेळोवेळी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून एस ९ कल्चरची ड्रिचिंग केली. त्यामुळे जमीन भुसभुसीत झाली व मूळा खोल रुजून झाडांच्या जोमदार वाढीसह चांगली फळधारणा झाली. यासाठी जैविक मिशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेंद्र तायडे यांनी मदत केली.
अजिंक्य मेडशीकर यांच्या फळबागेतील पेरूची झाडे अठरा महिन्यांची असून, त्यांची उंची १० ते १२ फूट आहे. सद्यस्थितीत झाडांना पेरू लागले आहेत. तिसºया वर्षापासून त्यांना यातून १० ते १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न अपेक्षीत आहे. सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, तसेच यातीन उत्पादने आरोग्यास पोषक असल्याने अजिंक्य मेडशीकर इतरांनाही सेंद्रीय शेतीसाठी प्रोत्साहित करीत आहेत.
अजिंक्य मेडशीकर यांनी एका हेक्टरमध्ये सेंद्रीय पेरूची बाग फुलविली आहे. त्यातून त्यांना वार्षिक १२ लाख उत्पन्न अपेक्षीत आहे.
-विलास ढवळे,
कृषी सहाय्यक, मेडशी