दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर संघटनेची प्रशासनाशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:05 PM2017-07-19T19:05:38+5:302017-07-19T19:05:38+5:30
वाशिम: दिव्यांगांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडीअडचणींबाबत अखिल भारतीय छावा संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: दिव्यांगांना विविध योजनांसाठी अर्ज सादर करताना येणाऱ्या अडीअडचणींबाबत अखिल भारतीय छावा संघटना तसेच राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली, अशी माहिती महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे यांनी बुधवारी दिली.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या निकषात बसणाऱ्या १०० टक्के व ९० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थींना आॅनलाईन अर्ज करतांना अनेक अडचणी येत आहेत. सेतु केंद्रामधून अर्ज करावा लागतो. हा अर्ज आॅनलाईन तयार करत असतांना जे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे त्यामध्ये दिव्यांगाची ८० टक्केपर्यत टक्केवारी स्विकृत करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ८० टक्क्याच्या पुढे १०० टक्क्यापर्यत कोणतीही टक्केवारी स्विकृत करण्याची सुविधा नाही. त्यामुळे लाभार्थीचा अर्ज तयार होत नसल्यामुळे त्या लाभार्थींना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. पर्यायाने सदर लाभार्थी वंचित राहू शकतात, ही वस्तूस्थिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनात आणून दिली. त्यामुळे या सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तो बदल तात्काळ करण्यात यावा. जेणेकरुन ८० टक्क्च्यावर १०० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या लाभार्थींना लाभ मिळेल व या तांत्रिक अडचणीमुळे तहसिल कार्यालयामध्ये अर्ज स्विकारण्यास अडचण येणार नाही. याकरीता पर्याय म्हणून योजना राबविणाऱ्या कक्षाने संबंधीत दिव्यांग अर्जदाराचे आॅनलाईन अर्ज स्विकारुन त्यांना लाभ द्यावा. याकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, छावा संघटना व सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजीक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी छावाचे विदर्भ अध्यक्ष गणेश गांजरे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनिष डांगे, जिल्हाध्यक्ष बेबी कोरडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.