अनुदानाच्या मागणीसाठी संस्थाचालक, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:10 PM2019-08-26T18:10:49+5:302019-08-26T18:11:08+5:30
जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत कामबंद आंदोलन करण्यात आले.
वाशिम : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत कामबंद आंदोलन करण्यात आले.
मागील २० वर्षापासून अनेक शाळा व महाविद्यालय विनाअनुदान तत्वावर सुरु आहेत. याठिकाणी विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. ज्या शाळांना २० टक्के अनुदान घोषित झाले आहे, त्याचे पुढील टप्पे त्वरित देण्यात यावे, २००५ नंतर नियुक्त झालेले सर्व शिक्षक व कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. विनाअनूदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे ९ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन तसेच विना अनुदानित शिक्षकांचे मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ २६ आॅगस्ट रोजी अमरावती विभागीय शिक्षक संघातर्फे तसेच संस्थाचालकांतर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काम बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रिसोड, मालेगाव, कारंजा, वाशिम, मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील बहुतांश शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला, असा दावा अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष अॅड. किरण सरनाईक यांनी केला. रिसोड तालुक्यातील बहुतांश शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कडकडीत बंद होती.