राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी संघटना सरसावल्या
By Admin | Published: August 15, 2015 12:32 AM2015-08-15T00:32:39+5:302015-08-15T00:32:39+5:30
विविध संघटनांचा सहभाग; रस्त्यावर पडलेले ध्वज उचलून सन्मान करण्याचे अवाहन.
वाशिम : स्वातंत्र्यदिन साजरा केल्यानंतर अनेक ठिकाणी देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणार्या राष्ट्रध्वजांचा अनादार केला जातो. तो होऊ नये, यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. रस्त्यावर पडलेल्या तिरंग्याला मानाने उचलून त्याचा सन्मान या संघटनांच्यावतिने केल्या जाणार आहे. राष्ट्रभक्तीचा आव व उत्साहापोटी दरवर्षीच १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी शालेय विद्यार्थी, लहान मुलांसह अनेक मोठय़ा व्यक्तीदेखील लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची खरेदी करतात; मात्र देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानल्या जाणार्या या राष्ट्रध्वजांचा १५ ऑगस्टच्याच सायंकाळी तसेच १६ ऑगस्टला ठायीठायी अनादर केला जातो. लहान आकारातील हे राष्ट्रध्वज रस्त्यावर कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिले जातात, असा प्रकार घडू नये, याकरिता वाशिम शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक संघटनांच्यावतिने आवाहन केल्या जात आहे; तसेच सोशल मीडियावरही यासंदर्भात पोस्ट पेस्ट केल्या जात आहेत. यासाठी शासनाच्यावतिनेही १३ ऑगस्टला अध्यादेश काढून पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी यासंदर्भात समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या सहाय्याने समित्या स्थापन केल्या जावून रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज संकलीत करण्यात येणार आहेत. या संदर्भात शासनाच्या निर्देशानुसार, ग्रामपंचायत स्तरावर गठीत केल्या जाणार्या समितीचे अध्यक्ष ग्रामसेवक राहणार असून, गावातील शाळांचे मुख्याध्यापक आणि पोलीस पाटील सदस्य असतील. नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर मुख्याधिकारी या समितीचे अध्यक्ष राहणार असून, शाळांचे मुख्याध्यापक आणि पोलीस निरीक्षक सदस्य असतील, त्यामुळे या प्रकाराला आळा बसणार आहे. शहरातील मारवाडी युवा मंचने तर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यावर पडलेले झेंडे उचलण्याची मोहीम हाती घेतली आहे; तसेच विविध संघटनांचे आवाहन व शासनाच्या पुढाकारामुळे सदर प्रकार घडणार नसल्याचे चित्र असले तरी प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारुन देशाच्या सन्मानासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे; तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह जिल्हय़ातील तहसील, पंचायत समिती, नगर परिषदेसह इतर कार्यालयावर ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.