शाळांच्या कंत्राटीकरणास संघटनांचा विरोध, कार्पोरेटला दत्तक नको
By संतोष वानखडे | Published: September 11, 2023 06:59 PM2023-09-11T18:59:44+5:302023-09-11T19:00:57+5:30
निवेदनानुसार, जिल्हा परिषद शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात केले होते.
संतोष वानखडे
वाशिम : वाशिमसह राज्यातील सर्व सरकारी शाळांचे कंत्राटीकरण करण्याला विरोध दर्शवून भविष्यात कोणत्याही सरकारी शाळा कार्पोरेट समूहाला दत्तक देवू नये, शिक्षण हक्क कायद्याच्या निकषाप्रमाणे शाळांच्या मूलभूत सुविधा ताबडतोब पूर्ण करा, या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले.
निवेदनानुसार, जिल्हा परिषद शाळा कंत्राटी पद्धतीने उद्योगपतींना चालविण्यास देणार असल्याचे उद्गार शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात केले होते. शिक्षणाचे कंत्राटीकरण करू नये, सरकारी शाळेत मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. निवेदनावर शाळा बचाव समितीसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.