शाळास्तरावर होणार फुटबॉल स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:23 AM2017-09-08T01:23:56+5:302017-09-08T01:24:14+5:30
फुटबॉल खेळासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती म्हणून शाळा स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : फुटबॉल खेळासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती म्हणून शाळा स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व क्रीडा विभागाने गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात मु ख्याध्यापक व फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींची मॅरेथान आढावा सभा घेतली. जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. या अनुषंगाने देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘मिशन-इलेव्हन मिलियन’ अभियान सुरू केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अभियान सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असून, जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी आपल्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, प्रा थमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डी.डी. नागरे उपस्थित होते. द्विवेदी म्हणाले, की खेळामुळे शरीर सदृढ व निरोगी राहते. त्यामुळे प्रत्येकाने किमान एका तरी क्रीडा प्रकारात रुची निर्माण केली पाहिजे. सर्व मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका तरी खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच १५ सप्टेंबर २0१७ रोजी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’मध्ये सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविकमध्ये पांडे यांनी ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’विषयी सविस्तर माहिती दिली. माध्यमिक शिक्षणाधिकारी नागरे यांनीही मार्गदर्शन केले. गुरुवारपासून स्पर्धेच्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात झाली.