अन्यथा पंचायत समितीला कुलूप ठोकू!
By admin | Published: April 28, 2017 01:40 AM2017-04-28T01:40:53+5:302017-04-28T01:40:53+5:30
सभापती, उपसभापतींनी दिला इशारा : प्रभारींमुळे विकासकामे खोळंबली
मंगरुळपीर : स्थानिक पंचायत समितीचा कारभार सद्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याने विविध विकासकामांचा पुरता फज्जा उडत आहे. त्यामुळे विनाविलंब कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्यावा; अन्यथा २ मे रोजी पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकू, असा निर्वाणीचा इशारा सभापती निलीमा देशमुख, उपसभापती सागर खोडके यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गुरूवारी सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.
गत अनेक दिवसांपासून मंगरूळपीर पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रभारी गटविकास अधिकारी हे कित्येक दिवसांपासून कार्यालयात आलेच नाहीत. त्यातच सद्या सर्वत्र पाणीटंचाईचे सावट असून याबाबत पंचायत समिती स्तरावर कुठलीही उपाययोजना नाही. मग्रारोहयो, सिंचन विहीरी, दलीत वस्तीची कामे, घरकुलांची कामे यामुळे रखडली असून कुणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचारीही निर्ढावले आहेत. कार्यालयातील बहुतांश खुर्च्या रिकाम्याच राहत असून दांडीबाज कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत वरिष्ठांना अवगत करुनही ते चुप्पी साधून आहेत. एकूणच या सर्व समस्यांमुळे संतप्त झालेल्या पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देवून कायमस्वरूपी गटविकास अधिकारी द्या; अन्यथा २ मे रोजी पंचायत समितीला कुलूप ठोको आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.