वाशिम जिल्ह्यात ३०० पैकी केवळ १६७ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 11:29 AM2021-01-17T11:29:36+5:302021-01-17T11:29:52+5:30
Corona Vaccine : पहिल्या दिवशीचे उद्दीष्ट गाठण्यात वाशिम जिल्हा राज्या २७ व्या क्रमांकावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, पहिल्या दिवशी वाशिम, कारंजा व मंगरूळपीर अशा तीन केंद्रांत ३०० पैकी केवळ १६७ (५६ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. पहिल्या दिवशीचे उद्दीष्ट गाठण्यात वाशिम जिल्हा राज्या २७ व्या क्रमांकावर आहे.
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे आमदार लखन मलिक, आमदार किरण सरनाइक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, ३०० पैकी १६७ आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. १३३ जण नियोजित ठिकाणी हजर न झाल्यामुळे त्यांना लस देता आली नाही.