सौरपंपाच्या ८४९पैकी ६९९ अर्ज अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:22+5:302021-03-05T04:41:22+5:30

वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने शासनाने नव्या कृषी धोरणाचा अवलंब केला आहे. यासाठी जिल्हाभरातील ८४९ शेतकऱ्यांनी अर्ज ...

Out of 849 applications for solar pumps, 699 are ineligible | सौरपंपाच्या ८४९पैकी ६९९ अर्ज अपात्र

सौरपंपाच्या ८४९पैकी ६९९ अर्ज अपात्र

Next

वाशिम : शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने शासनाने नव्या कृषी धोरणाचा अवलंब केला आहे. यासाठी जिल्हाभरातील ८४९ शेतकऱ्यांनी अर्ज केले असताना, ३ मार्चपर्यंत त्यापैकी केवळ १५० अर्जांना महावितरणकडून मंजुरी देण्यात आली, तर निकषात न बसल्याने ६९९ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आधीच पारंपरिक वीज जोडणीपासून वंचित असताना आता सौरपंपही मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

पुढील तीन वर्षात ग्राहक आणि शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न टाकता, सर्व कृषी ग्राहकांना टप्प्याटप्प्याने कायमस्वरुपी दिवसा ८ तास वीजपुरवठा मिळावा, यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार नवीन सर्वंकष कृषी वीज धोरण २०२० नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या धोरणात विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषणविरहीत सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषिपंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यासाठी ४४४ सौरपंपांचा कोटा निर्धारित करण्यात आला असून, जिल्ह्यातील ८४९ शेतकऱ्यांनी या योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, योजनेच्या निकषात न बसल्याने ६९९ अर्ज रद्द करण्यात आले, तर केवळ १५० अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे.

-------------------

सौर कृषिपंप योजनेचे निकष

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहेत; परंतु त्यांच्याकडे पारंपरिक वीज जोडणी नाही, ५ एकर किंवा त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, वीजजोडणीसाठी पैसे भरूनही विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी तसेच वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, नदी, विहीर, कुपनलिका, शेजारी शेती असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

-------------------

वाशिम जिल्ह्यासाठी ४४४ सौरपंपांचा कोटा

शासनाच्या नव्या कृषी धोरणांतर्गत शेतकऱ्यांच्या वीज जोडणीची समस्या सोडविण्यासाठी पारेषणविरहीत सौर कृषिपंप जोडणीचा पर्याय ऊर्जा विभागाने उपलब्ध करून दिला आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी सौर कृषिपंपांचा स्वतंत्र कोटा निर्धारित करण्यात आला असून, पारंपरिक कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता ४४४ सौर कृषिपंपाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

-----------

मंजूर अर्जांची तालुकानिहाय संख्या

तालुका मंजूर अर्ज

रिसोड ८६

मालेगाव ४९

मानोरा ०७

मंगरुळपीर ०६

कारंजा ०२

-------------------

कोट: सद्यस्थितीत सौर कृषिपंप जोडणीसाठी पूर्वी पारंपरिक वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या आणि न भरलेल्या शेतकऱ्यांचेही अर्ज स्वीकारले जात आहेत. निकषानुसारच शेतकऱ्यांना सौरपंप जोडणी मंजूर केली जात आहे. जिल्ह्यासाठी प्राप्त कोटा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

- आर. जी. तायडे,

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम

Web Title: Out of 849 applications for solar pumps, 699 are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.