ग्रामीण भागात टायगर मॉस्किटोचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:49 AM2021-09-17T04:49:18+5:302021-09-17T04:49:18+5:30
इंझोरी : ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून टायगर मॉस्किटोचा उद्रेक झाला आहे. या डासांमुळे इंझोरी परिसरातील सहा ते ...
इंझोरी : ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून टायगर मॉस्किटोचा उद्रेक झाला आहे. या डासांमुळे इंझोरी परिसरातील सहा ते सात गावांत हिवतापा, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे गावागावात आरोग्य तपासणी व धूर फवारणी करणे आवश्यक असतानाही ग्रामपंचायत व आरोग्य विभाग झोपेतच आहे.
गेल्या महिना, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने धडाका लावला आहे. यामुळे वातावरणात बदल होऊन विषाणू, जिवाणूचा प्रादुर्भाव होण्यास वाव मिळत आहे. शिवाय साठविलेल्या पाण्यात टायगर मॉस्किटो नावाच्या डासांची उत्पत्ती होत असून, हे डास हिवताप, डेंग्यू सदृश आजार पसरविण्यास कारणीभूत ठरत आहेत. इंझोरी परिसरातील इंझोरीसह म्हसणी, तोरणाळा, जामदरा घोटी, उंबर्डा लहान, दापुरा, चौसाळा आदी गावांत या डासांमुळेच हिवताप, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. घराघरात रुग्ण आढळत असताना ग्रामपंचायती व आरोग्य विभागाने डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासह आजार नियंत्रणासाठी आरोग्य तपासणी व धूरफवारणी करणे आवश्यक आहे; याकडे बहुतांश ग्रामपंचायती व आरोग्य विभागही दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे.
__________________
दूषित पाणी, डासांमुळे ग्रमस्थात भीती
पावसाळ्यात दूषित पाणी आणि डासांमुळे आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये डेंग्यू आणि चिकुन गुन्या या आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामुळे ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे
____________________
काय आहे टायगर मॉस्किटो
चिकुन गुन्या व डेंग्यू हे आजार विशिष्ट विषाणूमुळे होतात व एडिस एजिप्टाय नावाच्या डासामार्फत या रोगांचा प्रसार होतो. हा डास दिवसा व एकाचवेळी अनेक लोकांना चावतो. या डासाला पायावर पट्टे असल्याने याला "टायगर मॉस्किटो" म्हणतात.
__________________
कशी होते या डासाची उत्पत्ती
टायगर मॉस्किटो" या डासांची उत्पत्ती स्वच्छ, साठविलेल्या पाण्यात उदा. रांजण, माठ, पाणी साठविण्याच्या टाक्या, पाण्याचे हौद, कुलरमधील पाणी, रिकाम्या बाटल्या, डबे, नारळाच्या करवंट्या, टायर्स इत्यादीमध्ये होते.
______________________
कोट : ग्रामपंचायतला धूरफवारणीची औषध व मशीन नसल्याने दुसऱ्या ग्रामपंचायतकडून मशीन बोलाविली ती सुद्धा बंद असल्याने तिला दुरुस्ती करून एक-दोन दिवसामधे संपूर्ण गावात धूर फवारणी केली जाईल.
-शरद शिंदे
इंझोरी,
ग्रामविकास अधिकारी