समृद्ध गाव स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामांची फलश्रुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:52+5:302021-08-13T04:47:52+5:30
वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यांतील ५१ गावांत आता पाणी फाउंडेशनकडून ‘समृद्ध गाव स्पर्धा’ ...
वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यांतील ५१ गावांत आता पाणी फाउंडेशनकडून ‘समृद्ध गाव स्पर्धा’ घेतली जात आहे. सर्वच दृष्टिकोनांतून गाव समृद्ध करणे, हा या स्पर्धेचा उद्देश असून, वॉटर कप स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेतही पाणलोटाची, जलसंधारणाची कामे केली जात आहेत. यात नाला, नदी खोलीकरणासह शेततळ्याच्या कामांचाही समावेश आहे. कारंजा तालुक्यातील विळेगाव, जानोरी, तसेच मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन, जांब, पिंपळखुटा संगम, कारंजा तालुक्यातील जानोरी, विळेगाव, दोनद बु. बांबर्डासह विविध गावांत ही कामे वेगात सुरू आहेत. यातील काही कामे पूर्णत्वास गेली आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून, १२ जुलैपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत असल्याने खोलीकरण झालेल्या नदी, नाल्यांसह शेततळी आता या पावसानंतर तुडुंब भरली आहेत. या पाण्यामुळे गावातील भूजल पातळी तर वाढणार आहेच; शिवाय शेतकऱ्यांनाही पुढील काळात सिंचनासाठी त्याचा आधार होणार आहे.
-------------------
शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत प्रशासनाचे सहकार्य आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी रखरखत्या श्रमदानासह मजुरांनी मनरेगाअंतर्गत कामे केली आहेत. श्रमदान आणि प्रशासनाच्या सहकार्यातून खोलीकरण झालेले नाले आणि नदी पावसामुळे काठोकाठ भरल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
-------------