स्टेरॉईड, सिटी स्कॅनचा अतिमारा ठरतोय कोरोना रुग्णांना घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:08 AM2021-05-05T05:08:24+5:302021-05-05T05:08:24+5:30
वाशिम : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना सिटी स्कॅनचा सल्ला दिला जात असून, स्टेरॉईड, सीटी ...
वाशिम : कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह येण्यापूर्वीच तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेकांना सिटी स्कॅनचा सल्ला दिला जात असून, स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिमारा कोरोना रुग्णांना घातक ठरू शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातूनच वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले.
पहिल्या लाटेनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग नेमका किती प्रमाणात झाला, हे तपासण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने सीटी स्कॅनचा समावेश असून, त्याचा अतिमारा कोरोना रुग्णांना घातक ठरण्याची भीती वर्तविली जात आहे. कोरोनाच्या धास्तीने वारंवार 'सिटी स्कॅन' करणाऱ्या बाधितांना आरोग्य विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. एकदा सिटी स्कॅन करणे १०० ते २०० वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, त्यामुळे भविष्यात कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो, असे सांगत आरोग्य विभागाने सावधगिरीचा इशाराही दिला.
०००००००
११० सीटी स्कॅन होतात रोज
जिल्ह्यात दैनंदिन सरासरी ४०० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे सरासरी १०० ते ११० च्या आसपास सीटी स्कॅन होत असल्याची माहिती आहे. कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर त्यालाही सीटी स्कॅनचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे सीटी स्कॅनची संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
०००००
एक सीटी स्कॅन म्हणजे १०० ते २०० एक्सरे
एक सिटी स्कॅन करणे १०० ते २०० वेळा छातीची क्ष-किरण तपासणी करण्यासारखे असून, याचे विपरित परिणामही संबंधितांना भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी आहे, ज्यांच्यात लक्षणे तीव्र आहेत अशा रुग्णांनाच 'सिटी स्कॅन'चा सल्ला देणे योग्य ठरते, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
००००००
स्टेरॉइडचे दुष्परिणाम काय आहेत
स्टेरॉइड हा एक रासायनिक पदार्थ आहे, ज्याचा वापर एखाद्या विशेष आजाराच्या उपचारावेळी केला जातो. मांसपेशीचा विकास करण्यासाठी याचा वापर केला जात असला तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. त्याने खोकला, सर्दी अशा समस्या सतत होण्याचा धोका असतो. सीटी स्कॅन, स्टेरॉईडचा अतिवापर करणे शक्यतोवर टाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.
००००
कोट
कोरोना विषाणूचा संसर्ग अतिप्रमाणात झाला असेल, फुप्फुसांपर्यंत संसर्ग झाला असेल तर या दोन्ही उपचारांची गरज भासते. सीटीस्कॅन, स्टेरॉईड्सचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे.
- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक