गावठाणातील मिळकतीचे स्वामित्व अद्याप अनिश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:40+5:302021-05-25T04:46:40+5:30
ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा राहत नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा ...
ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा राहत नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या मिळकतधारकांची मोठी गैरसोय होते. तसेच गावठाणाचे नकाशे, अभिलेख नसल्याने विविध विकास योजना राबविताना ग्रामपंचायतींनासुद्धा अडचणी येतात. कर आकारणी, बांधकाम परवानगी यासारख्या बाबींसाठी सुलभता आणण्यासाठी गावठाणाचे नकाशे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणाचे नकाशे तयार करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी दिला होता. याद्वारे प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होईल, तसेच त्याचे नेमके क्षेत्रही माहिती होणार असल्याने मिळकतधारक व ग्रामपंचायत यांना अधिकृत दस्तावेज उपलब्ध होईल, हा त्यामागे उद्देश होता; परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाची व्याप्ती वाढल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा उपाययोजनांच्या अंमलबजावणी गुंतल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.
.....................
बाॅक्स :
जागेची मिळकत पत्रिका मिळणार
प्रत्येक मिळकतीची सीमा व क्षेत्र निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला तिच्या जागेची मिळकत पत्रिका मिळणे शक्य होणार आहे. गावठाणातील घर, जागेचा मालकी हक्क पुरावा व त्या आधारे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार असून नागरिकांना आपल्या मिळकतीच्या सीमा व नेमके क्षेत्र माहिती होईल. मालमत्ता संबंधित अभिलेख व नकाशे तयार झाल्याने त्यांची आर्थिक पत उंचावेल, गावठाणातील जागेची मालकी हक्क संदर्भातील वाद व तंटे मिटण्यास मदत होईल. तसेच गावठाणातील जमिनीची खरेदी-विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळता येणार आहे. त्यामुळे गावठाणातील मिळकतीचे स्वामित्व निश्चित होणे अत्यावश्यक ठरत आहे.