नाल्याच्या पुरात बैल ठार; बैलगाडी वाहून गेली
By Admin | Published: June 29, 2016 12:30 AM2016-06-29T00:30:58+5:302016-06-29T00:30:58+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस; धुरकरी व मुलगी जखमी.
साखरखेर्डा (जि. बुलडाणा): येथून जवळच असलेल्या गोरेगाव परिसरात मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे गोरेगाव, सावंगी भगत रस्त्यावरील नाल्याला पूर आला. या नाल्यातून सुरेश त्र्यंबक गवई यांनी बैलगाडी काढण्याचा प्रयत्न केला असता, बैलगाडी वाहून गेली. मोठय़ा शिताफीने त्यांनी आपले व मुलीचे प्राण वाचविले तर एका बैलाचा मृत्यू झाला.
शेतकरी त्र्यंबक गवई यांनी नाल्यातील पुरातून बैलगाडी काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पूर जास्त असल्यामुळे बैलगाडी वाहून गेली. बैलगाडीसोबतच या पुरात सुरेश गवई आणि त्यांची मुलगी निखिता गवई हेदेखील वाहून गेले; परंतु सुरेशने मोठय़ा हिमतीने निखिता (वय १६) हिला पुराच्या पाण्यातून वाचविले. यात एक बैल ठार झाला.
निखिताच्या पोटात पाणी गेल्याने तिला तातडीने रुग्णालयात हलविले, तर सुरेशवरही प्राथमिक उपचार करण्यात आले. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर आहे. ही वार्ता गावात पसरताच बाबूराव मोरे, रहिमखा पठाण, वासुदेव पंचाळ, कैलास पंचाळ, रईसखॉ पठाण, भरत ठाकूर यांनी सहकार्य केले.
*साखरखेर्डा परिसरात जोरदार पाऊस आल्यानंतर नाल्याला पूर आला. या पुरातून बैलगाडीसह सुरेश गवई आणि त्यांची मुलगी निखिता गवई हेही वाहत गेले; परंतु सुरेश यांनी मोठय़ा हिमतीने मुलगी निखिता हिला वाचविले.
* देऊळगावराजा मार्गावरील वाकी फाट्यावर रस्त्याशेजारी २७ जून रोजी पत्तीसवर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस तक्रार झाल्यानंतर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यानंतर युवकाचा मृत्यू झाला असावा, अशी नोंद पोलिसांनी पंचनाम्यात केली आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी आक स्मिक मृत्यूची नोंद केली आहे.