जिल्ह्यात ऑक्सिजननिर्मिती प्लांट साकारणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:18 AM2021-03-04T05:18:44+5:302021-03-04T05:18:44+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्लांट साकारला ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्लांट साकारला जाणार आहे. केंद्र सरकारकडून यासाठी निधी मिळाला असून, प्लांटचे काम महिनाभरात पूर्ण होण्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडसाठी रुग्णांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट नसल्याने अकोला येथील प्लांटमधून वाशिम जिल्ह्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर मागविण्यात येतात. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून वाशिम येथेच ऑक्सिजन प्लांटची निर्मिती व्हावी असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून मध्यंतरी उमटला होता. ‘लोकमत’नेदेखील वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. ऑक्सिजनअभावी रुग्णांना गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात १३ केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १० ऑक्टोबर रोजी वाशिम येथे ‘आरटी-पीसीआर’ प्रयोगशाळेच्या ई-उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या निधीमधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचालीही प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र, त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली आल्याने हा प्रश्न बाजूला पडला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वाशिम येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या. केंद्र सरकारने राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीला मंजुरी दिली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात हा प्लांट उभारण्यात येणार असून, प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. एका महिन्यात प्लांटचे काम पूर्ण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
---------------------बॉक्स
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
अतिजोखीम गटातील रुग्णांना तातडीने ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, तसेच संभाव्य परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची गरज असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने सप्टेंबर महिन्यात विविधांगी वृत्तांकन करीत या विषयाकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते.
-----------------------------
वाशिम येथेच ऑक्सिजन निर्मिती होणार !
यापूर्वी वाशिम येथे १३ केएल क्षमतेचा (१० हजार लिटर) लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे प्रस्तावित होते. आता ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारला जाणार असल्याने वाशिम येथे ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. परजिल्ह्यातून ‘ऑक्सिजन’ची आयात करण्याची गरज राहणार नाही.
--------------------------कोट बॉक्स
केंद्र सरकारच्या नावीन्यपूर्ण योजनेतून वाशिम येथे ऑक्सिजन निर्मिती प्लांटला मंजुरी मिळालेली आहे. प्राथमिक टप्प्यातील प्रशासकीय प्रक्रियादेखील पूर्ण झालेली आहे. साधारणत: एका महिन्यात प्लांट पूर्णत्वाकडे येईल, असा अंदाज आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम