वाशिम जिल्ह्यात तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 11:00 AM2021-05-06T11:00:46+5:302021-05-06T11:00:55+5:30
Oxygen production project : ऑक्सिजन बेडमध्ये वाढ तसेच तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतच रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी धावाधाव करीत लागत आहे. आगामी तीन ते चार महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अंदाज लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी सुरू असून, ऑक्सिजन बेडमध्ये वाढ तसेच तालुकास्तरावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी मेडशी (ता. मालेगाव) येथे आढळून आला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक वाढली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता सरकारी आरोग्यविषयक सुविधादेखील हळूहळू उपलब्ध होत असून, जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये मात्र व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यासाठी रुग्णांसह नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
अशातच तीन ते चार महिन्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता गृहीत धरून वरिष्ठ यंत्रणेकडूनदेखील आरोग्यविषयक सुविधा व उपाययोजनांचा आढावा घेतला जात असून, अधिकाधिक सुविधा उपलब्ध कशा होतील, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार वाशिम व कारंजा येथे अनुक्रमे ७५ व ५० ऑक्सिजन खाटा वाढविण्याचे नियोजन आहे.
याशिवाय वाशिम येथे दोन आणि कारंजा येथे एक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून, आणखी चार ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले. कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याचेदेखील नियोजन सुरू आहे.
कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याचे नियोजन
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तालुकास्तरावर तसेच लोकसंख्येने मोठ्या ग्रामपंचायत स्तरावर कोविड केअर सेंटरची संख्या वाढविता येईल का, या दृष्टिकोनातूनदेखील विचारविनिमय सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षापासून जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन हे परिश्रम घेत असून, यापुढेही तिसरी लाट थोपविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व शासनाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला सर्वाधिक प्राधान्य राहणार आहे.
या तालुक्यांमध्ये होणार ऑक्सिजन निर्मिती
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तालुकास्तरावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून वाशिम, मंगरूळपीर, रिसोड व मालेगाव येथे प्रत्येकी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट प्रस्तावित करण्यात आला आहे. तुर्तास मानोरा तालुक्याचा यामध्ये समावेश नसल्याने मानोरा तालुक्यातही ऑक्सिजन निर्मिती प्लांटबाबत नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.