लसीकरणाची कासवगती; गरज रोज ३७०० डोसची, मिळतात केवळ ६०० !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:57+5:302021-05-09T04:41:57+5:30
वाशिम : लसीचा सर्वत्रच तुटवडा असून, वाशिम जिल्ह्यातही लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येते. दररोज ३७०० डोसची गरज ...
वाशिम : लसीचा सर्वत्रच तुटवडा असून, वाशिम जिल्ह्यातही लसीकरण मोहीम कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येते. दररोज ३७०० डोसची गरज असताना कोविशिल्ड लसीचे केवळ ६०० ते ७०० डोस उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकांना दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. १६ जानेवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत एका महिन्यातपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे. लसीअभावी अर्धेअधिक केंद्र प्रभावित झाले आहेत. दैनंदिन ३७०० ते ३८०० डोसची गरज असताना केवळ ६०० ते ८०० दरम्यान डोस मिळतात. आठवड्यातून एका वेळी उपलब्धतेनुसार १२ ते १८ हजारादरम्यान डोस मिळतात. एका आठवड्यात किमान २९ हजार डोस मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी डोस मिळत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे तसेच दुसऱ्या डोससाठी नागरिकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.
०००००००००००
केवळ ३३ केंद्र सुरू
मागणीच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय स्तरावर सात, जिल्हा सामान्य रुग्णालय एक आणि २५ प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण ३३ केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. यापैकी काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीचा साठा संपल्याने ते तूर्तास बंद असल्याची माहिती आहे. येत्या तीन, चार दिवसांत लसीचा साठा उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत आहे.
०००००००००००००००
नागरिक वैतागले
लसीचा पहिला डोस घेऊन ३५ दिवस होत आहेत. मात्र, दुसरा डोस मिळाला नाही. लस उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने संबंधित केंद्रावरून खाली हात परतावे लागत आहे. लस केव्हा उपलब्ध होईल, याकडे लक्ष लागून आहे.
- सिंधुबाई सरकटे
०००००००
१८ ते ४४ वयोगट आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना कोणत्या केंद्रावर कोणती लस मिळेल याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने लस घेण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. या केंद्राकडून त्या केंद्रावर पाठविण्यात येत असल्याने मानसिक त्रास होत आहे.
- राजू सरतापे
000000000000
लसीसाठी नोंदणी करून सात दिवस झाले आहेत; मात्र अजून मोबाईलवर संदेश आला नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर संदेश येईल, असे सांगण्यात येत आहे. पहिला डोस केव्हा मिळेल, याकडे लक्ष आहे.
- रुपेश शर्मा
००००००
जिल्हा सामान्य रुग्णालयात १८-४४ वयोगटांतील लसीकरण
जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच सहा ग्रामीण रुग्णालय स्तरावरील केंद्रात, नोंदणी केलेल्या आणि मोबाईलवर संदेश प्राप्त झालेल्या १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात येत आहेत. ४५ वर्षांवरील नागरिकांना वाशिम शहरातील जुने नगर परिषद इमारतीजवळील आरोग्य केंद्र व लाखाळा परिसरातील न. प. शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात येतात.
००००००००००००००
सकाळपासूनच लसीकरणासाठी नागरिकांची रांग
लसीचा डोस मिळावा याकरिता सकाळपासूनच संबंधित केंद्रासमोर नागरिकांची रांग लागत असल्याचे दिसून येते. लसीकरण महत्त्वाचे आहे; पण गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नागरिकांनी खबरदारी घेणेही आवश्यक ठरत आहे. लसीकरणासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
००००००