पंचायत समिती घेणार घरकुल योजनेचा आढावा !
By admin | Published: May 19, 2017 07:25 PM2017-05-19T19:25:11+5:302017-05-19T19:25:11+5:30
रिसोड : घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने ग्रामसेवकांचा आढावा घेतला जाणार आहे.
ऑनलाइन लोकमत
रिसोड - प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला की नाही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी रिसोड पंचायत समितीच्यावतीने संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवकांचा आढावा २५ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात घेतला जाणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय तसेच दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबाना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली आहे. दारिद्ररेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. रिसोड तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत शेकडो लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्यात आला. मात्र, अद्याप काही लाभार्थींना अनुदानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचा निधी मिळाला नसल्याच्या तक्रारी पंचायत समितीला प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने सभापती छाया पाटील व उपसभापती महादेव ठाकरे यांनी घरकुलसंदर्भात आढावा सभा बोलाविण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना केल्या होत्या. यानुसार तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घरकुलासंबंधीची संपूर्ण माहिती बोलाविली असून, २५ मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेतला जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर मंजूर घरकुल लाभार्थींची यादी, पंचायत समितीला घरकुल प्रस्ताव कधी सादर झाला, लाभार्थीला आतापर्यंत मिळालेले अनुदानाचे हप्ते, प्रलंबित हप्ते आणि घरकुलाची आजची स्थिती अशी माहिती बोलाविल्याने घरकुलाच्या प्रलंबित अनुदानाचा तिढा सुटणार असल्याची अपेक्षा लाभार्थींमधून व्यक्त होत आहे. घरकुल अनुदान वितरणात प्रचंड दिरंगाई करणाऱ्यांविरूद्ध कारवाईदेखील प्रस्तावित केली जाणार असल्याची माहिती आहे.