सुट्यांमुळे रखडले खरडलेल्या जमिनींचे पंचनामे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:51 PM2018-06-24T15:51:19+5:302018-06-24T15:54:01+5:30
नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले.
वाशिम : २२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या; तर काहीठिकाणी केलेली पेरणी वाहून गेली. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले. सोमवारपासून मात्र ही प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गतवर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे यंदा अल्पावधीतच शेतशिवारांमधील जलस्त्रोत पूर्णत: आटले होते. अशा बिकट परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील काही शेतकºयांनी चालू पावसाळ्यात पहिल्या एक-दोन पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पेरणी उरकती घेतली. अनुकूल वातावरणामुळे बीजांकुर होऊन पिके देखील डोलायला लागली. मात्र, २२ जूनच्या मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकवेळ शेतकºयांना संकटात पाडले असून नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसून शेलगाव बोंदाडे, कळमेश्वर, अनसिंग, सोंडा, इलखी, कोंडाळा महाली या गावांसह इतरही अनेक गावांमधील शेतजमिनी खरडल्या गेल्या. काही शेतशिवारांमध्ये तर माती वाहून गेल्याने सद्या सर्वत्र दगडधोंडे पसरल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनींमध्ये दुबार पेरणी होण्याचीही शक्यता धुसर असल्याने शेतकरी पुन्हा एकवेळ मोठ्या संकटात सापडले आहेत. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते. मात्र, सुट्यांमध्ये रममान प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठी अशा तीन लोकांच्या चमूचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यावर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, २२ जूनच्या पावसाने झालेल्या नुकसानाचेही सर्वेक्षण केले जाईल.
- बाळासाहेब बोराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम