वाशिम जिल्ह्यात गारपिटीच्या नुकसानाचे पंचनामे संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:32 PM2018-02-19T13:32:16+5:302018-02-19T13:33:35+5:30
वाशिम: जिल्ह्यात गत आठवड्यात सतत तीन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतातील उभ्या पिकांना फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील २६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. राज्य शासनाने या पिक नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी व महसूल विभागाला दिले; परंतु अद्याप कृषी विभागाच्यावतीने सर्वेक्षणच पूर्ण करण्यात आले नाही.
गत आठवड्यात १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वाशिम जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसासह गारपिट झाली. या गारपिटीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडी या पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, निंबू, केळी, पपई, द्राक्ष आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान राज्यभरातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. यासाठी कृषी आणि महसूल विभागाला संयुक्त पाहणी करून पीक नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही दिले; परंतु आता आठवडा उलटत आला तरी, वाशिम जिल्ह्यातील पिक नुकसानीचे सर्वेक्षणच पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यास विलंब लागणार असून, शेतकºयांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.